पंढरपूर :- पंढरपूरचा आषाढी यात्रेचा सोहळा सहा जुलै रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी दहा मानांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत. येणाऱ्या वारकऱ्यांना आता पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सीलबंद पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, आंबा पेय किंव्हा फळांचा ज्यूस देण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर नगरपालिकेने सीलबंद पाणी बॉटल पुरवण्याचे दीड कोटी रुपयांचे तर लिंबू सरबत फळांचा ज्यूस पुरवण्यासाठी दीड कोटी रुपयांचे असे एकूण तीन कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
यापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना सील बंद थंड पिण्याचे पाणी, लिंबू सरबत दिला जायचा. मात्र यावर्षीपासून ही जबाबदारी नगरपालिकेवर सोपवली आहे. यासाठी नगरपालिकेला येणारे अनुदान, इतर शासकीय अनुदान, जिल्हा नियोजन योजना, नगरोत्थान आणि पंढरपूर नगर परिषदेचा फंड या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.
सदरचे सीलबंद पाणी , लिंबू सरबत, फळांचा ज्यूस याचे वाटप 65 एकर भक्ती सागर, दर्शन रांग , चंद्रभागा नदीपात्र, पत्रा शेड , वाखरी पालखी तळ आणि चौरस्ता या ठिकाणी करण्यात येणार आहे. मागील वर्षी आषाढी यात्रेमध्ये देखील सीलबंद बॉटल मधून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला होता. संबंधित ठेकेदाराची वितरण व्यवस्था अपुरी पडल्याने भाविकांपर्यंत पाणी पोहोचलेच नव्हते. आता ही जबाबदारी नगरपालिकेवर आली आहे. वीज, रस्ते, नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता , चांगले रस्ते यासह मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. या सुविधा भाविकांना पुरवतानाच नगरपालिकेचा बोजवारा उडतो. आता पाणी आणि फळांचा ज्यूस वाटण्याचे नवी जबाबदारी नगरपालिकेवर आली आहे.
