पंढरपुर:- विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन मंडपात उभारलेल्या वारकरी दांपत्यास बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याची गंभीर घटना आज शुक्रवारी घडली आहे. रेवणनाथ चंदनशिवे असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
सध्या आषाढी यात्रेची लगबग सुरू झाली आहे. पालख्यांचे प्रस्थान झाल्याने मोठ्या प्रमाणात भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत आहेत. भाविकांच्या दर्शनाची सुविधा व्हावी यासाठी मंदिर समितीने दर्शन रांग दर्शन मंडप तयार केला आहे. सध्या दर्शन रांग गोपाळपूर पत्रा शेड पर्यंत पोहोचली आहे. याच पत्रा शेडमध्ये वारकरी दाम्पत्य विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. यावेळी तेथे तैनात असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने या दांपत्याला मारहाण केल्याचे समजते. किरकोळ कारणावरून थेट दर्शन रांगेत उभे असलेल्याच वारकरी दाम्पत्याला मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली.
यापूर्वी मंदिर समितीने नेमलेल्या रक्षक एजन्सीच्या सुरक्षारक्षकांनी देखील भाविकांना मारहाण केली होती, दर्शन रांगेमध्ये पैसे घेऊन भाविकांना सोडले होते, भाविकांना शिवीगाळ केली होती या कारणावरून त्यांचा ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर समितीने आवर्जून बीव्हीजी या आंतरराष्ट्रीय कंपनीला अनुभव नसतानाही सुरक्षेचा ठेका दिला आहे. बीव्हीजीला ठेका देऊन अजून दहा दिवस झाले नाहीत तोपर्यंतच त्यांच्या सुरक्षारक्षकांनी थेट वारकरी दाम्पत्याला मारहाण केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
यावर आता मंदिर समिती काय निर्णय घेणार याकडे समस्त वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित सुरक्षारक्षकास माफीनामा घेऊन कामावरून काढून टाकल्याची माहिती बीव्हीजी कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक देशमुख यांनी दिली.
