मंदिरातील आत्या मामाची जोडी….
व्हीआयपी दर्शनाला सोडी…..

पंढरपूर :- भारताची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख आहे. वर्षात चार मोठ्या यात्रा पंढरपुरात भरतात. विठुरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. यंदाच्या आषाढी यात्रा काळात 20 लाख भाविक उपस्थित होते. व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांना ताटकळत दर्शन रांगेत उभे रहावे लागते म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद केले होते. मात्र याच काळात मंदिरात काम करणाऱ्या दत्ता मामाने समितीच्या सहअध्यक्ष ,सदस्य ,कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्वांच्या उपस्थितीत सहा भाविकांना व्हीआयपी दर्शनाला सोडले. तर दुसरीकडे मंदिर सुरक्षेचा कुठलाही अनुभव नसलेल्या बीव्हीजी कंपनीला विठ्ठल मंदिर सुरक्षेचा ठेका देण्यात आला. त्यात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आषाढी यात्रा काळात दोनदा वारकऱ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. मात्र अजूनही ना बिव्हीजी वर कारवाई झाली ना तो दत्तामामा कोण आहे हे समोर आले.
समितीमध्ये व्हीआयपी दर्शनाचा बादशाह म्हणून दत्ता मामाचा वावर आहे. कितीही गर्दी असो वा व्हीआयपी दर्शन बंदचा कायदा असो दत्ता मामा हमखास दर्शन देतो ही त्याची ख्याती आहे. आषाढी यात्रा कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शन बंद केले होते. मात्र या दत्ता मामाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी तुडवत, मंदिर समितीच्या नाकावर टिच्चून 6 भाविक व्हीआयपी दर्शनला सोडले. यावेळी व्हीआयपी दर्शनाच्या रजिस्टर मध्ये संदर्भ दत्तामामा आणि समितीच्या एका कर्मचाऱ्याचा होते. याची सखोल माहिती प्रसिद्धी माध्यमांनी केल्यानंतर मंदिरात व्हीआयपी दर्शनाला सोडणारी आत्या, मामाची जोडी पुढे आली.
प्रसिद्धी माध्यमांनी विषय हातात घेतल्याचे कळाल्यावर आत्याला आणि दत्ता मामाला एसीत घाम फुटला. व्हीआयपी दर्शन रजिस्टर मधील त्या कर्मचाऱ्यांचे नाव सोडण्यात आले. सुरुवातीला तीन भाविकांचा उल्लेख केला होता. तो देखील खोडून सहा भाविक व्हीआयपी दर्शनाला सोडल्याचे घेण्यात आले. घटना घडून दहा दिवस झाले तरी अद्याप या आत्या मामाच्या जोडीवर समितीने कारवाई केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला फक्त दत्तामामा आणि आत्यानेच नाही तर समितीने देखील केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षेचा कुठलाही अनुभव नसताना विठ्ठल मंदिर सुरक्षेचा ठेका देण्यात आला. कामाला सुरुवात झालेल्या पहिल्याच आठवड्यात दर्शन मंडपामध्ये एका वारकऱ्याला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने बेदम मारहाण केली. यावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांना विचारले असता, बीव्हीजी मान्यवर कंपनी आहे असे सांगत त्यांनी हात झटकले. या घटनेवर पडदा पडत नाही तोपर्यंत आषाढी एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्याने दर्शन मंडपामध्ये उभे असलेल्या भाविकाला रक्त बंबाळ होईपर्यंत मारहाण केली. यावर देखील समिती गप्प आहे. भाविकांनी पोलीस स्टेशनमध्ये कुठलीही तक्रार दिली नाही. संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे. तो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामावर होता. असा खुलासा करून हे प्रकरण देखील समितीने दडपल्याशी चर्चा आहे. मुळात बीव्हीजी कंपनीच कंत्राटी पद्धतीने असताना त्यांच्याकडील कर्मचारी वेगळ्या पद्धतीने कसा कंत्राटी कामगार होऊ शकतो असा सवाल देखील आता वारकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी मंदिर सुरक्षेचा ठेका असणारी रक्षक कंपनीवर भाविकांना मारहाण केल्याचा ठपका ठेवत कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करण्यात आला होता. तसेच मंदिर सुरक्षेसाठी 25 निवृत्त सैनिक नेमण्याच्या अटीचा देखील भंग रक्षण कंपनीने केला होता. बीव्हीजी कंपनीने देखील अद्याप 25 निवृत्त सैनिकांची नेमणूक मंदिरात सुरक्षेसाठी केली नाही. तरी देखील समितीच्या वतीने बीव्हीजी कंपनीवर मेहरबानी दाखवण्यात येत आहे.
तथाकथित आत्या मामाच्या जोडीने व्हीआयपी दर्शनाला सोडल्याचे कबूल करून देखील त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही. तथाकथित दत्तामामाचे तर अनेक कारनामे उजेडात येत आहेत. तरी समिती कारवाई करण्यास तयार नाही. संबंधित आत्या, मामा अन् बिव्हीजी कंपनीवर समिती कारवाई का करत नाही याचा “अर्थ” काय ? अशी चर्चा आता सुरू आहे.
