पंढरपूर :- शहरातील कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप यांची मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान धारदार सत्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेला 24 तास उलटले तरी अद्याप ना हत्येचे कारण समजले ना मारेकऱ्यांचा सुगावा लागला. मारेकरांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली आहे. सर्व छोट्या-मोठ्या बाबी लक्षात घेऊन पोलिसांचा तपास सुरू आहे.
लखन जगतापचे घर हे शहरातील कुंभार गल्लीमध्ये निर्जन स्थळी आहे. याच ठिकाणी लखन आणि त्यांची आई सुरेखा यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती.
लखन जगताप हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मंगळवारी 8 वाजून 43 मिनिटांपर्यंत तो आपल्या कंपनीच्या कार्यालयामध्ये उपस्थित होता. घरी आल्यानंतर त्याने आपले कपडे बदलून साधे कपडे घातले. आणि याच वेळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान लखन आणि त्याची आई सुरेखा यांची घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी लखनच्या पाठीवर, हातावर, मानेवर आणि डोक्यावर तब्बल 16 वार करण्यात आले. तर आई सुरेखा यांच्या डोक्यावरच 9 वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. माय लेकाचा खून करून मारेकरी बाहेरून घराला घरी कडी लावून निघून गेले होते. लखन चे वडील रात्री घरी आल्यानंतर ही घटना सर्वांना समजली.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह जिल्हा गुन्हे शाखा आणि पंढरपूर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीच सारा परिसर पिंजून काढला. मात्र ठोस माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. आज दिवसभर पंढरपूर शहरात याच घटनेची चर्चा होती.
