
पंढरपूर :- मंगळवेढ्यात राहून पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीत वाळू तस्करी करणाऱ्या आकाश उर्फ भैय्या संजय रोकडे ( रा. मुढवी ता. मंगळवेढा) याला पंढरपूर तालुका पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. आकाश रोकडे याच्यावर वाळू तस्करीसह सहा गुन्हे दाखल आहेत.

आकाश उर्फ भैय्या संजय रोकडे हा ओझेवाडी, पंढरपूर आणि मंगळवेढ्यात भीमा आणि माण नदीत अवैधरित्या वाळू तस्करी करत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, चोरी करणे, वाळू तस्करी करणे, दहशत निर्माण करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत. आपल्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याने स्वतःला वाळू तस्कर म्हणून सिद्ध केले होते.
आकाश रोकडे याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे आळा घालणं आवश्यक होते. त्यामुळे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी रोकडे विरुध्द एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे यांच्या कडे पाठवला होता. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आकाश रोकडे यांस 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन 15 ऑगस्ट रोजी त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
