
पंढरपूर :- वैद्यकीय शिक्षणाचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावात राजस्थान आणि हरियाणा मधून आलेल्या तीन तोतया डॉक्टरांनी दवाखाना थाटल्याची गोपनीय माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे रोपळे गावात छापा टाकला असता तीन तोतया डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असताना रंगेहाथ सापडले. गोविंदा देवी राम प्रजापती ( वय – 27 रा. भरतपूर राजस्थान) , जहीर खान (वय वर्ष 22 राहणार पलवल हरियाणा) आणि आसिफ दिन मोहम्मद ( राहणार भरतपुर राजस्थान ) या तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यांमध्ये तोतया डॉक्टरची टोळी सक्रिय असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याला मिळाली होती. ही टोळी रोपळे गावात रुग्णांची फसवणूक करून त्यांच्यावर बेकायदेशीर रित्या उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकली असता हे तीन तोतया डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांची सखोल तपासणी केली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इंजेक्शन व इंजेक्शन साठी वापरण्यात येणारे लहान मोठ्या औषधाच्या बाटल्या, टॅबलेट्स व इतर वैद्यकीय साहित्य सापडले. सदर आरोपींची टोळी राजस्थान आणि हरियाणातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बीड येथे राहणारा सतीश सोळंकी यांच्या मध्यस्थीने या आरोपींनी रोपळे गावातील एका वस्तीवर खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी तीन बोगस डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तोतया डॉक्टरांना ताब्यात घेतला असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या आरोपींवर मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 1956 कलम 15/2 , महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 1961 कलम 33 तसेच बी एन एस कलम 318/4, 319/2/3/5 प्रमाणे गुन्हा दाखल केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली.
