टेंभुर्णी नजिकच्या वेणेगांव येथील घटना तीन संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात
पंढरपूर :- टेंभुर्णी नजिकच्या वेणेगांव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात पंढरपूर येथील दोन मित्र व त्यांचे सहकार्यांमध्ये नाचगाण्याची बैठक लावण्याच्या कारणावरून भांडण लागले. हे भांडण सोडवत असताना त्यापैकी एकाने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून जीवे मारण्याच्या हेतूने गोळी झाडली असता या गोळीबारात वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळु कोठावळे (वय 27) यांच्या मांडीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात कोठावळे यास दाखल केले असून डाॅक्टरांनी शस्त्रक्रियाकरून गोळी बाहेर काढल्याने प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी, वाखरी (पंढरपूर) येथील देवा बाळू कोठावळे व त्याचे मित्र ज्ञानेश्वर बंदपट्टे, वैभव ननवरे, सचिन साळुंखे असे सर्वजण वेणेगांव येथील जय मल्हार कला केंद्रावर बारीसाठी आले होते. त्यावेळी कला केंद्र समोर ज्ञानेश्वर बंद पट्टे यांच्या ओळखीचा पंढरपूर येथील सुरज पवार व त्याचे तीन मित्र अगोदरच तेथे होते. त्यावेळी रात्रीचे सव्वा बारा वाजले होते. देवा कोठावळे व त्याचे मित्र यांनी कला केंद्र या ठिकाणी नाच गाण्याची बैठक लावण्यासाठी कलाकेंद्र मॅनेजर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आता वेळ संपत आलेली आहे फक्त अर्ध्या तासाची एकच बैठक देता येईल. तेव्हा फिर्यादी सोबतचा ज्ञानेश्वर बंदपट्टे याने त्याच्या ओळखीचा सुरज पवार यांना आपण एकत्र एक बैठक लावून असे म्हणाला असता सुरज पवार हा ज्ञानेश्वर बंदपट्टे यास आम्ही काय भुरटे आहोत काय ? तू एकत्र बैठक लावायचे म्हणतो या कारणावरून त्यांची एकमेकांत बाचाबाची होऊन भांडणे लागली. यावेळी सुरज पवार सोबत आलेल्या मित्रांनी बंदपट्टे यास मारहाण करण्यास सुरूवात केली.त्यावेळी फिर्यादी देवा कोठावळे व त्याचे दोन मित्र भांडणे सोडत असताना सुरज पवार यांच्याबरोबर असलेल्या तीन मित्रांपैंकी एका मित्राने फिर्यादी देवा कोठावळे यांचे दिशेने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. देवा कोठावळे याच्या मांडीत गोळी घुसल्याने तो जखमी झाला.या घटनेनंतर तातडीने जखमी देवा कोठावळे यास टेंभुर्णीतील मार्श हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी शस्त्रक्रियाकरून मांडीतील गोळी बाहेर काढली असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी देवा कोठावळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सुरज पवार सह त्याच्या सोबतचे तीन मित्र अशा चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेनंतर या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुरज पवार आणि त्याचे तीन साथीदार फरार झाले. त्यामुळे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, पोलीस हवालदार संदीप गिरमकर, विलास नलवडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मोहन तळेकर यांचे पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले चौकशी सुरू आहे.
दरम्यान बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस अंजली कृष्णा व्ही.एस यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत.
