पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील आढीव आरती चव्हाण (वय 25) या महिलेला प्रसुती दरम्यान चुकीचा रक्त पुरवठा करणारी डॉक्टर गजानन बागल यांच्या हॉस्पिटलमध्ये असणारे स्वामी समर्थ ब्लड स्टोरी सेंटर आज शासनाने बंद केले. आरती चव्हाण या महिलेचा मृत्यू स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरने चुकीचे रक्त पुरवल्याने झाला असल्याची बातमी सर्वप्रथम दैनिक सिंहासन पायाखाली प्रकाशित केले होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या बातमीची तात्काळ दखल घेत ब्लड सेंटरवर कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आढीव गावातील आरती चव्हाण ही महिला प्रसूतीसाठी मोहिते हॉस्पिटल येथे दाखल झाली होती. प्रसुती दरम्यान त्यांना रक्त देणे गरजेचे होते. यासाठी नातेवाईकांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर येथून रक्त आणले. मात्र हे रक्त देत असताना स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरच्या टेक्निशियनने रुग्णाचे रक्त आणि पिशवीतील रक्ताचे व्यवस्थित क्रॉस मॅच केले नाही. वास्तविक पाहता वैद्यकीय क्षेत्राच्या नियमानुसार दोन्ही रक्तातील विसंगतता ( incompatibility ) योग्यरित्या तपासली नाही. त्यामुळे रुग्णाचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे निगेटिव्ह असताना रुग्णाला ओ निगेटिव्ह रक्तपुरवठा केला.
मोहिते हॉस्पिटलमध्ये दोन डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सदर रुग्णाला हे रक्त पुरवण्यात आले. त्यानंतर काही तासांनी रुग्णाला प्रसुती वेदना होत असताना लघवी वाटे रक्त बाहेर पडू लागले. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसुतीची शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाला पुढील उपचारासाठी सोलापूरला घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला.
सोलापूर मध्ये देखील रुग्णाने उपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाला.
सदरची बातमी सिंहासन टाइम्स ने प्रकाशित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. आज सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी मोहिते हॉस्पिटल मधील डॉक्टर पवन कुमार मोहिते यांच्यासह त्यांच्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले.
तसेच स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरचे प्रमुख डॉक्टर गजानन बागल यांचा देखील जबाब नोंदवला. या स्टोरेज सेंटरच्या एका कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी असल्याने फक्त सलाईन मॅच केले. विसंगतता तपासली नसल्याची चूक आपल्या जबाबामध्ये मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व अहवाल पुणे विभागीय आयुक्त जी. डी. हुकरे यांनी स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर करण्याचे आदेश दिले.
या आदेशात म्हटले आहे की, रक्त घटक वितरित करताना ते रुग्णाच्या रक्तासोबत मॅच आहे किंवा कसे याबाबत योग्य प्रकारे क्रॉस मॅचिंग केलेले आढळून येत नाही ती अत्यंत गंभीर बाब आहे सबब जन आरोग्य व जनसंस्थांच्या दृष्टिकोनातून आपले रक्त साठवणूक केंद्राचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात यावे.
सदरच्या कारवांमुळे पंढरपूर शहरासह जिल्ह्यातील ब्लड बँक आणि ब्लड स्टोरेज सेंटरचे धाबे दणाणले आहेत.
