पंढरपूर मध्ये एका तज्ञ डॉक्टरच्या नावावर चार-पाच पॅथॉलॉजी लॅबचे परवाने…. लवकरच सविस्तर वृत्त
मतदार संघातील महिलेचा मृत्यू झाला तरी आमदार अभिजीत पाटलांची अधिवेशनामध्ये चुप्पी.
पंढरपूर :- पंढरपूर शहरातील मोहिते हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आरती चव्हाण या 25 वर्षीय महिलेचा चुकीचे रक्त दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 4 डिसेंबर रोजी सोलापूर येथे उपचारादरम्यान आरती चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. घटना घडून आठ दिवस लुटली तरी अद्याप संबंधित स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरवर कारवाई झाली नसल्याने पंढरपूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आरती चव्हाण यांच्या दुर्दैवी मृत्यू बाबत दैनिक सिंहासन टाइम्सने पहिल्यांदा बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर गजानन बागल चालवत असलेल्या स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर, डॉक्टर मोहिते यांचे मोहिते हॉस्पिटल, सोलापूरचे मॅग्नम हॉस्पिटल, सोलापूरची रक्तपेढी या सर्वांची तपासणी केली होती. प्राथमिक तपासामध्ये स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटरने चुकीचे रक्त दिल्याची बाब पुढे आली आहे.
सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनामध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील अनेक प्रश्नांना वाचा फोडत आहेत. मात्र आरती चव्हाण यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी एक चकार शब्द देखील अधिवेशनादरम्यान काढला नाही त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तपासणीचा अहवाल पुणे विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र आठ दिवस उलटून देखील अद्याप संबंधित ब्लड स्टोरेज सेंटर, डॉक्टर गजानन बागल किंवा इतर जे प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत त्यांच्यावर अद्याप गुन्हा नोंद झाला नाही. स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर तात्पुरते सील करून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा फार्स केल्याची भावना आता पंढरपूरकरांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
संबंधित ब्लड स्टोरेज सेंटर, दोषी असलेले डॉक्टर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर ,राज्य महिला आयोग, इंडियन मेडिकल असोसिएशनला निवेदन देण्यात येणार असून मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
पंढरपुरात अनेक ठिकाणी प्रशिक्षित, तज्ञ स्टाफ नसताना देखील ब्लड बँकेचे कामकाज सुरू आहे. एका डॉक्टरच्या नावावर चार चार ठिकाणी पॅथॉलॉजी लॅब सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आम्ही लवकरच उजेडात आणत आहोत.
