
नगरपालिकेत भालके गटाला धक्का , सहा नगरसेवक स्वतंत्र गट करणार स्थापन
पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉ. प्रणिताताई भालके नगराध्यक्षपदी निवडून आल्या तर भाजपचे 24 नगरसेवक निवडून आले. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक अवघे 11 निवडून आले. नुकत्याच उपनगराध्यक्ष पद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी देखील झाल्या. मात्र आता या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरूनच तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये दोन गट पडले आहेत. सहा नगरसेवकांनी आपली वेगळी चूल मांडण्याची तयारी केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून अनेक जण इच्छुक होते. मात्र सर्व इच्छुकांना झुलवत ठेवत भालके गटाने शेवटच्या क्षणी अत्यंत गोपनीय पद्धतीने राहुल शिंदे नाईक यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावरून अनेक नगरसेवक नाराज झाले होते. कुठल्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता. पार्टी मीटिंग न घेता स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आल्याने नगरसेवकांसह अनेक नेते नाराज होते.
या नाराजीचे रूपांतर आता बंडखोरी मध्ये झाले आहे. पुढील आठवड्यात सहा नगरसेवक आपल्या वेगळ्या गटाला मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करणार आहेत. त्यामुळे भालके गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. या सहा नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपची ताकद पंढरपूर नगरपालिकेत वाढणार आहे. सहा नगरसेवकांनी वेगळीच चूल मांडल्यास नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता ताई भालके यांना अवघ्या पाच नगरसेवकांना सोबत घेऊन नगरपालिकेचा कारभार चालवावा लागणार आहे. संख्याबळ अत्यंत कमी झाल्याने बालकेंना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भाजप आणि परिचारक गटाचे 24 नगरसेवक असताना आता भालके गटाचे सहा नगरसेवकांनी वेगळी चूल मांडल्याचा निर्णय घेतल्याने 30 नगरसेवक भालके यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे.
