जिल्हा परिषदेच्या चार सर्वसाधारण जागेवर नेत्यांच्या कुटुंबाचा कब्जा.
पंढरपूर :- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पंढरपूर मध्ये तालुक्याच्या राजकारणात मातब्बर घराणे म्हणून ओळख असणाऱ्या सर्वच कुटुंबांनी आपल्याच घरातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भालके गटाने स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या सुनबाई डॉक्टर प्रणिता ताई भालके यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. आता तोच भालके पॅटर्न जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील दिसून येत आहे.
आज भोसे गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील यांच्या सुनबाई प्रफुल्लता पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्याचबरोबर वाखरी जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या सुनबाई मोनिका समाधान काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून दाखल केला.
तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरचे माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे नातू प्रणव परिचारक हे करकंब जिल्हा परिषद गटातून इच्छुक असल्याची चर्चा आहे. ते भाजपच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
तर गोपाळपूर गटातून स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
एकंदरीतच तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांपैकी सर्वसाधारण जागेसाठी राखीव असलेल्या भोसे, करकंब, वाखरी आणि गोपाळपूर या जागांवर तालुक्यातील राजकीय घराण्यांनीच कब्जा केल्याचे दिसत आहेत.
वास्तविक पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका महानगरपालिका , ग्रामपंचायती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. मात्र सध्या या सर्व निवडणुकांमध्ये पुढाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच रिंगणामध्ये उभं केलेले दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या सुनबाई डॉक्टर प्रणिता ताई भगीरथ भालके या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यामुळे इतर राजकीय घराण्यांचा देखील आत्मविश्वास बळावला आहे. आपल्या घरातील व्यक्ती देखील पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकते असा आत्मविश्वास या भालके पॅटर्नमुळे आल्याने अनेक कार्यकर्त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले आहे.
आपल्या नेत्याला आमदार,खासदार,मंत्री करण्यासाठी कार्यकर्ता अहोरात्र झटत असतो.
मात्र आता नेत्यांच्या घरातील सदस्यच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असल्याने आम्ही कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायचा का? असा सवाल आता निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
