पंढरपूर :- राज्य सरकारने सर्व जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 12 जून पासून पंढरपूर मध्ये अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमदार रोहित पवार हे आंदोलन करणार आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप त्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले असून प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनाला परवानगी दिली नाही तर संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करू असा इशारा त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
राज्य सरकारने नुकतीच शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. यामध्ये सरकारने अनेक जाचक अटी आणि शर्ती घातला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या सर्व अटी शर्ती काढून टाकून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी आमदार रोहित पवार हे 12 जून पासून पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमरण अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र आज आठ जून उजाडला तरी प्रशासनाने आंदोलनाला परवानगी दिली नाही. यावरून आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनाला परवानगी दिली नाही तर आपण संत नामदेव पायरी जवळ अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिला आहे.
सध्या अधिक मास सुरू असल्याने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक पंढरपूरला येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमदार रोहित पवार यांनी संत नामदेव पायरी जवळ आंदोलन केले तर वारकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकतात. यावर आता प्रशासन काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
