“देवाच्या शाही वस्त्रांचा सन्मान की प्रदर्शन?”
आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला शक्यतो त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांकडून किंवा इतर प्रतिष्ठित व्यक्तींकडून शाही वस्त्र पाठवली जातात. शाही वस्त्र अर्पण करण्याची परंपरा ही राज्याच्या भक्तीचे प्रतीक आहे. शेकडो वर्षे चालत आलेली ही प्रथा म्हणजे प्रजेच्या वतीने देवाची केलेली सेवा होती. परंतु आज हीच परंपरा प्रसिद्धीच्या गोंधळात अडकत चालली आहे, हे वास्तव चिंताजनक आहे.
वस्त्रे मंदिर समितीकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आता संक्षिप्त विधी न राहता एक मोठा सोहळा झाला आहे. प्रसिद्धीसाठी ही वस्त्रे अनेक हातांमधून फिरतात, अनेकदा उघडून दाखवली जातात, फोटो-व्हिडिओसाठी त्याचा वापर होतो. काही ठिकाणी पायात चप्पल घालूनच ती हाताळली जातात. देवाला अर्पण करण्यापूर्वीच अनेकांच्या स्पर्शाने त्याचे पावित्र्य भंग पावते.
प्रश्न प्रसिद्धीचा नाही, प्रश्न आस्थेचा आहे. ज्या वस्त्रांना आपण “शाही” म्हणतो, ती वस्त्रे शेवटी देवाची आहेत. देवासाठी आणले एक फूलही आपण श्रद्धेने हातात घेतो, डाव्या हाताने कधी देवाची पूजा करत नाही. मग ही वस्त्रे बेदरकारपणे हाताळणे कितपत योग्य?
परंपरा टिकवायची असेल तर तिचा आत्माही जपावा लागेल. यासाठी मंदिर समितीने कठोर नियम करावेत. वस्त्रे सीलबंद स्वरूपात, केवळ पुजाऱ्यांच्या हस्ते स्वीकारली जावीत. सुपूर्दीचा कार्यक्रम विधीयुक्त आणि अल्प असावा. प्रसिद्धीला भक्तीच्या आड येऊ देऊ नये.
शाही वस्त्रे म्हणजे कोणाचीही मालकी नाहीत. ती विठ्ठल-रुक्मिणीची आहेत. हा भाव जर आपण जपला नाही, तर परंपरा जिवंत राहील पण तिची पवित्रता मात्र मरण पावेल.
आषाढीच्या निमित्ताने हीच खरी आत्मपरीक्षा आहे.
हा माझा भाव आहे श्रद्धा आहे. देवाचे प्रावित्र्य जपले पाहिजे.
अभिराज उबाळे
पंढरपूर
