मंदिर समितीच्या काही सदस्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकांची बदली करण्याची मागणी केल्याची चर्चा.
पंढरपूर:- आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य विरुद्ध मंदिराचे प्रशासकीय अधिकारी असा तू -तू, में – में सामना रंगताना दिसतोय.नुकतंच आषाढी यात्रेच्या महापूजेचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समितीने मुंबईला जाऊन दिले. यावेळी समितीच्या काही सदस्यांनी कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्या तक्रारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केल्याची चर्चा सुरू आहे. फक्त तक्रारीवरच न थांबता कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकांची बदली करण्याची मागणी देखील केल्याचे समजते.
आषाढी एकादशीच्या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी नुकतीच मंदिर समिती मुंबईला गेली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिल्यानंतर काही विश्वस्त थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेले. वास्तविक पाहता पंढरपूरच्या मंदिरे समिती सदस्यांचे महसूल खात्याकडे कधीच कुठले काम असत नाही. पण यंदा समिती विश्वस्त तथा सदस्य हे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्या बदल्यांची शिफारस करण्यासाठी महसूल मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले. विश्वस्त व सदस्यांची कैफियत महसूल मंत्र्यांनी ऐकली. पण, सध्या आपण आषाढीला येणाऱ्या भाविकांचे नियोजन करू. तुमच्या तक्रारीवर आषाढी नंतर पाहू….असा सल्ला बावनकुळे यांनी विश्वस्तांना दिला.
या साऱ्या घडामोडी मध्ये समिती सदस्य विरुद्ध अधिकारी असा नक्की वाद का झाला ? असा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहेत. समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी मंदिर समितीला मोठी शिस्त लावली. अनेक बदल मंदिर व्यवस्थापनात केले आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या, टोकन दर्शन सुविधा हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काही सदस्य दुखावल्याची चर्चा समितीच्या वर्तुळात सुरू होती. कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकांनी कडक धोरण अवलंबल्याने दररोज मंदिरात येऊन ठिय्या मांडून बसणाऱ्या सदस्यांच्या कारभाराला चांगलाच चाप बसला. हेच सदस्य सध्या कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या बदलीसाठी महसूल मंत्र्याकडे फिल्डिंग लावत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या आषाढी यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच भाविकांच्या हिताच्या चर्चा सरकार दरबारी करण्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या बदली करा अशा तक्रारी करून सदस्यपणाचा तोरा काही मंडळी मिरवताना दिसत आहेत अशी प्रतिक्रिया सामान्य पंढरपूरकरांच्या मनोदयातून व्यक्त होत आहे.
