पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सध्या सत्ताधारी आणि विरोधक गटाकडून सुरू आहेत. यंदा प्रथमच भाजपाने कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी कमळ चिन्हावर देखील निवडणूक लढण्यास तयारी दर्शवली आहे. हेच समर्थक परिचारकांना कमळ चिन्ह विधानसभेला नको म्हणून सल्ला देत होते. आज कमळ चिन्हावर उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे फक्त परिचारकांच्या उमेदवारी वेळेसच कमळ चिन्ह पाहून मतदान होत नाही मात्र नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी कमळ चिन्ह चालू शकते का? मग परिचारक समर्थकच आपल्या नेत्यांना फसवत आहेत त्यांचा विश्वासघात करत आहेत का अशी चर्चा सध्या पंढरपूरमध्ये सुरू आहे.
कमळ चिन्ह परिचारकांसाठी खरंच अस्पृश्य ठरले आहे का? की त्यांच्या समर्थकांनी याविषयी एक भ्रम निर्माण करून ठेवला आहे. यासाठी मागील विधानसभा निवडणुकीचा मागोवा घेऊया.
पंढरपूर विधानसभेवर सतत 25 वर्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थानावर तीन दशके परिचारक कुटुंबाची एक हाती सत्ता आहे. मात्र 2009 नंतर मतदार संघाची रचना बदलल्यानंतर तालुक्यातील सर्व राजकीय समीकरणं बदलली. भाजपासोबत जाऊन 2014 मध्ये प्रशांत परिचारक यांनी कमळ चिन्ह नको म्हणून शेतकरी संघटना, भाजप महायुतीकडून निवडणूक लढवली होती. यावेळी आमदार भारत भालके यांनी त्यांचा 8 हजार 913 मतांनी पराभव केला होता. 2019 मध्ये परिचराकांनी थेट पाच वेळा पंढरपूर विधानसभेचे नेतृत्व केलेल्या माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना भाजपच्या कमळ चिन्हावर रिंगणात उतरवले. मात्र त्यांचाही 13 हजार 361 मतांनी आमदार भारत भालके यांनी पराभव केला. दोन्ही वेळेस परिचाराकांना नाकारले गेले. मात्र 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जनतेतून परिचारक गटाच्या साधनाताई भोसले निवडून आल्या. परिचारक यांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले त्यांचे बहुमत नगरपालिकेत स्थापन झाले.
2014 आणि 2019 या दोन पराभवानंतर भाजप समर्थकांनी मालक आपल्याकड कमळ चालत नाही असा सल्ला दिला. कमळ चिन्हाला दलित, मुस्लिम आणि पुरोगामी समाजाचे मतदान होत नाही. असे ठासून सांगितले. याचा प्रत्येक लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आला. जे समर्थक परिचारकांना कमळ चिन्ह नको म्हणत होते तेच समर्थक आज पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये कमळ चिन्ह घेऊन लढण्यास तयार झाले आहेत. यामध्ये दलित, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे समर्थक देखील सहभागी आहेत. त्यामुळे कमळ फक्त परिचारकांना चालत नाही बाकी त्यांच्या समर्थकांना चालते का अशी चर्चा पंढरपूरमध्ये सुरू आहे. नागेश काका भोसले यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांना सलग साडेसात वर्षे परिचारकांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये परिचारकांना यश मिळवून देण्यात त्यांची नगराध्यक्ष आणि नगरसेवक कमी पडताना दिसत आहेत.
राजकारणातील मातब्बर घराणे समजले जाणारे परिचारकांचे राजकीय समीकरण कुठे चुकते की खरोखरच त्यांच्यासाठी कमळ अस्पृश्य ठरत आहे? की त्यांचे समर्थक फक्त त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या वेळी मतदान मागतात आणि विधानसभेच्या वेळी मात्र एक निष्ठेने काम करत नाहीत का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
