मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासमोर आव्हान…..
पंढरपूर :- तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये वाढते अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. एक महिन्यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पंढरपूर नगर पालिकेने अतिक्रमण काढण्यावर चुप्पी साधली आहे. तर दुसरीकडे मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. मंदिर परिसरात देखील वाढते अतिक्रमण कॉरिडॉरला आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासमोर कॉरिडॉर प्रकल्प राबवणे आणि अतिक्रमण काढणे ही दोन मोठी आव्हाने असणार आहेत.
मागील वर्षी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर पालिका, पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवून शहरातील अतिक्रमण काढले होते. आषाढी यात्रे नंतर ते जैसे थे झाले हा भाग वेगळा. मात्र पंढरपूरच्या तथाकथित समाजसेवकांसमोर पोकळ धाडस दाखवणं देखील कमी नव्हतं. कारण सर्व अतिक्रमण हे समाजसेवक, माजी नगरसेवक, कुठल्या तर संघटनेचा अध्यक्ष समाजाचा अध्यक्ष यांनीच केले आहे. काही तथाकथित समाजसेवकांना या अतिक्रमणाचा हप्ता देखील जातो अशी चर्चा पंढरपुरात आहे.
मागील दोन वर्षापासून पंढरपूर मधील मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प राबवला जाणार असे चर्चा आहे. या चर्चेने आता मूर्त स्वरूप घेतले आहे. यामध्ये मंदिर परिसरातील जवळपास 600 मालमत्ता बाधित होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सर्व प्रकल्प बाधितांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांच्या मागण्या नोंदवून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर शहरातील वाढत्या अतिक्रमणाची बाब समोर आली. त्यावेळी त्यांनी पंढरपूर नगरपालिकेला अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण ही फक्त पंढरपूरची समस्या नाही संपूर्ण देशाची समस्या आहे असे मोठे विधान केले होते. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेने या सूचनेचा सोयीस्कर अर्थ घेत कुठलीच कारवाई केली नाही.
मात्र दुसरीकडे मंदिर परिसरात पिढ्यानपिढ्या उभारलेली वाडे, संतांच्या समाध्या, व्यावसायिकांची दुकानं कॉरिडॉरच्या नावाखाली पाडण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. यामध्येच डीपी प्लॅन मध्ये मंदिर परिसरातील आणखीन दोनशे मालमत्ता बाधित होणार असल्याची चर्चा आहे. नागरिकांच्या हक्काच्या घरांवर, व्यवसायावर नांगर फिरवून मंदिर परिसर संपूर्णतः मोकळं करण्यासाठी निघालेली नगरपालिका अतिक्रमण कधी काढणार ? हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. नव्याने नियुक्त झालेले मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासमोर कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यापासून पंढरपूर शहर अतिक्रमण मुक्त करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवणार किती देखील पूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांप्रमाणेच पानावर पान टाकणार हे आता काळच ठरवेल.
