यातील कर्मचाऱ्याचे खुलासा पत्र दैनिक सिंहासन टाइम्स च्या हाती…..
पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या गोशाळेतील नवजात वासराची जबरदस्तीने दूध पाजून हत्या केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन कर्मचारी त्या वासराला जबरदस्तीने दूध पाजताना दिसत आहेत. याप्रकरणी समितीकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया पुढे आली नाही. मात्र समितीने 20 एप्रिल रोजी घटना घडल्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याचा फार्स करून या गोवंश हत्येवर पडदा टाकला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे योगेश पाठक आणि तानाजी जाधव हे दोन कर्मचारी गाईचे दुध काढत होते. याच दरम्यान त्यांनी वासराला गाईचे दुध पाजले. त्यानंतर पुन्हा त्यांनी गाईचे दूध काढले. त्यानंतर त्यांच्या मध्ये कसाई जागा झाला. अचानक या दोघांनी त्या नवजात वासराची मान धरून भांड्यात तोंड घातले. यावेळी ते वासरू झटपट करू लागले. पुन्हा या कर्मचाऱ्यांनी त्याला आपल्या पायात पकडून दाबले आणि भांड्यात तोंड घातले. त्यानंतर काही मिनिटांमध्ये आई समोरच त्या वासराने जीव सोडला. ही सर्व दृश्ये समितीच्या सी सी टीव्ही मध्ये कैद झाली आहे.
ही घटना समितीच्या व्यवस्थापकांच्या कानावर गेली. त्यांनी गोशाळा गाठली आणि माहिती घेतली. कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा फार्स करण्यात आला. कसे झाले ? कुणी केले ? आता मार्ग कसा काढायचा याची चर्चा झाली. 30 एप्रिल रोजी त्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली.
( आस्थापना/ का वि/ 268/025 दिनाक 30/4/2025 ) या नोटीस द्वारे त्यांचा लेखी खुलासा घेण्यात आला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी 17 मे रोजी समितीकडे लेखी खुलासा सादर केला. आणि समितीने गोवश हत्येची फाईल बंद करून टाकली. यावर समितीचे सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र प्रत्येकाने या घटनेवर पडदा टाकण्याचे पाप केले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी सामान्य नागरिकांचे मोबाईल नंबर ब्लॉक केले असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या बातम्या आल्यानंतर व्यवस्थापक आणि गोशाळेतील कर्मचाऱ्यांना बोलवून व्हिडिओ लिक कसा झाला ? इतकी काळजी घेऊन बाहेर कसा पडला ? याचा जाब विचारला आहे.
तब्बल तीन महिन्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि नवजात वासराच्या हत्येला वाचा फुटली. आता समितीने गुन्हा दाखल करण्याचा फार्स सुरू केला. या प्रकरणी गोरक्षक आक्रमक झाले आहेत. गुन्हा दाखल न झाल्यास थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
