वारकऱ्यांना नाहक मारहाण करण्याचे प्रकार वाढले….
पंढरपूर :- आषाढी यात्रेदरम्यान श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने ठेका दिलेल्या बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून यात्रा कालावधीत मारहाण झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वादग्रस्त ठरणाऱ्या सदर बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी मंदिर समितीकडे केली आहे. याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास भाविकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी मंदिर समितीला दिला आहे.
आषाढी यात्रेदरम्यान राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. मात्र भाविकांवर दर्शन रांगेतून लघुशंकेला सुरक्षा रक्षकाला सांगून गेलेल्या भाविकांवर परत रांगेत उभारण्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचे अनेक प्रकार यात्रेदरम्यान घडले आहेत. यामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत असताना इतर भाविकांनी या दुर्दैवी प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत सदर कंपनीवर कठोर कारवाईची मागणी करत संतप्त प्रतिक्रिया मंदिर समिती विरोधात व्यक्त केल्यानंतर मंदिर समितीकडून सुरक्षारक्षकावर कारवाई करण्यात आल्याचे सांगून अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कर्मचारी प्रशिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
तरी देखील मारहाण झाल्याचे प्रकार घडल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या रक्षकांकडूनच अशा प्रकारचे वर्तन होणे ही अत्यंत दुर्दैवी, गंभीर बाब असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सदर बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा मागणीचे निवेदन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
::::: भाविकांना मारहाण होण्याचे प्रकार वाढले ::::::
मंदिर समिती मार्फत बीव्हीजी नामक कंपनीला सुरक्षारक्षकाचा ठेका देण्यात आला आहे. सदर कंपनीने समितीच्या नियमावलीनुसार रक्षक पुरवले पाहिजे होते. मात्र समितीच्या नियमांचे उल्लंघन सदर कंपनीकडून होत असल्याने भाविकांना मारहाण होण्याचे प्रकार वाढले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिगंबर सुडके यांनी सांगितले.
