तहसील कार्यालयाने पाठवला अहवाल.
चार आमदार आणि दोन खासदार असताना जनतेला उरला नाही वाली.
दिवसाढवळ्या गरिबांच्या तोंडातील घास घेतला जातो हिसकावून.
पंढरपूर :- पंढरपूर शहर आणि तालुक्यात धान्य वितरण करणारा ठेकेदार बेकायदेशीरपणे खासगी जागेत, खासगी गाडी धान्य भरताना रंगेहाथ शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सापडला होता. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अतिरिक्त पुरवठा निरीक्षक जगन्नाथ कुंभार यांच्या फिर्यादीवरून प्रशांत सयाजी हगारे (रा. हगारेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदाराच्या कामात अनियमितता आणि बेकायदेशीरपणा असल्याचा अहवाल पंढरपूर तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. यामध्ये ठेका रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले आहे.
30 सप्टेंबर रोजी कराड रोड वरील कीर्ती गावानाजीक निर्जन ठिकाणी अन्नधान्य प्रकरणाच्या दोन ट्रक मधून तब्बल 50 किलोचे 220 पोती ठेकेदाराच्या वाहनातून खासगी वाहनात भरताना शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ बडवे यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी रंगल्या. अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांवर जबाबदारी झटकून काढता पाय घेतला. पंढरपूर ग्रामीण पोलिस शेवट पर्यंत जागेवरून हलले नाहीत. अखेर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
गोरगरिबांचे दोन, तीन किलो धान्य कुणाच्या घशात जाते.
शासनाकडून 50 किलोची पोती पाठवली जातात. मात्र 2 ते 3 किलो गहू आणि तांदूळ कमी दिला जातो . रेशन दुकानदारांना कायम 46 ते 47 किलोच धान्य मिळते. याचा फटका दुकानदाराबरोबर ग्राहकांना देखील बसत आहे. महिन्याला 60 हजार किलो धान्याची खुल्या बाजारामध्ये विक्री होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. चार आमदार आणि दोन खासदार असलेल्या तालुक्यात खुलेआम गरिबांच्या तोंडातील घास ५१ घेतला जात आहे. त्यामुळे आता जनतेनेच संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.
