पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची पंढरपूर शहरात नगरपरिषद हद्दीत यमाई तलावाजवळ गोशाळा आहे. या गोशाळेतील कर्मचा-याने नवजात वासरास जबरदस्तीने दुध पाजून हत्या केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावरून दैनिक सिंहासन टाइम्सने गोवंश हत्येबद्दल बातमी प्रसिद्ध केली होती. तीन महिने यशस्वीरित्या प्रकरण दडपल्यानंतर अखेर आज मंदिर समितीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात योगेश सुधाकर पाठक आणि तानाजी रामचंद्र जाधव यांच्या वर भारतीय न्याय संहिता 325 व 3(5) अंतर्गत प्राण्यास मारून टाकल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोषी आढळल्यास पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते.
मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले गोशाळेतील कर्मचारी योगेश सुधाकर पाठक व तानाजी रामचंद्र जाधव या दोन्ही कर्मचा-यांने 2 ते 3 दिवस वयोमान असलेल्या वासरास दुध पाजताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने सदर नवजात वासराचा मृत्यू झाल्याचे सस्कृतदर्शनी दिसून येत आहे. याबाबत त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या दष्टीने गोशाळा विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. 2023 मधील कलम 325 व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याशिवाय, मंदिर समितीच्या आगामी सभेत सदरचा विषय ठेवून पुढील योग्य ती कारवाई देखील नियमानुसार करण्यात येईल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीस पाठीशी घातले जाणार नाही असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
काय आहे भारतीय न्याय संहिता 325 ची व्याख्या…..
बीएनएस कलम ३२५ मध्ये प्राण्याला मारून किंवा अपंग करून दुष्कर्म करण्याच्या गुन्ह्याची व्याख्या केली आहे आणि त्याला शिक्षा दिली आहे.
जो कोणी कोणत्याही प्राण्याला मारून, विष देऊन, अपंग करून किंवा निरुपयोगी करून दुष्कर्म करेल त्याला पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
