पंढरपूर :- पंढरपूर शहर आणि तालुक्याला अवैध सावकारकीचा विळखा पडला आहे. थोडीशी रक्कम देऊन अवाच्या सव्वा व्याज दराने पठाणी वसुली केली जात आहे. आता या अवैध सावकार की करणाऱ्या सावकारांच्या मुसक्या आवळण्याचे काम पंढरपूर शहर पोलिसांनी सुरू केले आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सज्जन कल्लाप्पा माने (राहणार चळे तालुका पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील फिर्यादी सज्जन माने हे पंढरपूर शहरातील टाकळी रोडवरील गजानन नगर येथे सलूनचे दुकान चालवतात. सज्जन माने यांनी त्यांच्या ओळखीचे खाजगी सावकार योगेश रमेश शिंदे (राहणार एलआयसी ऑफिस पाठीमागे पंढरपूर) , अजित रामचंद्र हजारे (राहणार टाकळी रोड पंढरपूर) अमोल बाबासाहेब गांजाळे ( राहणार गोविंद पुरा पंढरपूर) व सोन्या पवार (राहणार गाडगेबाबा चौक पंढरपूर) यांचेकडून व्याजाने पैसे घेतले होते.
फिर्यादी सज्जन माने यांनी सदरच्या चार सावकारांकडून घेतलेली रक्कम व व्याज परत फेड केले होते. तरीदेखील संबंधित सावकारांनी दिलेल्या पैशासाठी तगादा लावला होता. या पैशापोटी या सावकारांनी सज्जन माने यांची मोटरसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने काढून घेतले होते.
याबाबतची तक्रार सज्जन माने यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती.
या लेखी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सविस्तर तपास सुरू केला. शहर पोलीस ठाण्याचे एक पथक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील एक पथक यांनी संयुक्तपणे सदर सावकारांच्या घरी जाऊन पंचनामे केले. यामध्ये या चार सावकारांच्या घरी कोरे चेक, करारनामे, खरेदीखत व कोरे स्टॅम्प हस्तगत करण्यात आले. तपासाअंती हे चारही सावकार बेकायदेशीर सावकारकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.
सज्जन माने यांच्या तक्रारीनुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बेकायदा सावकार की कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
यावेळी पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी शहर आणि तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोणीही बेकायदा सावकार की करीत असतील तर त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच खाजगी सावकारांनी कोणतेही बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करू नये अन्यथा त्यांची गळ केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंढरपूर पोलिसांच्या या कारवाईने अवैध सावकारकी करणाऱ्या सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद कामतकर, शिवशंकर हुलजंती ,राहुल लोंढे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, शहाजी मंडले ,प्रसाद औटी,दीपक नवले यांच्या पथकाने केली आहे.
