७ जणांविरूद्ध खासगी सावकारीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा
पंढरपूर :- खासगी सावकारांकडून घेतलेल्या पैशांचे मुद्दलांपेक्षा व्याज अधिक देऊनही कर्ज फिटत नसल्याने कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना आणि सावकारांच्या त्रासाला कंटाळून पंढरपुरातील व्यावसायिकाने राहत्या घरी छताला लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाखरी येथे ही घटना घडली असून, मयताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे ७ जणांविरूद्ध खासगी सावकारकीसह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश मारूती कांबळे (वय ६४, रा. वाखरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नांव आहे.
सुरेश कांबळे यांचे पंढरपुरात ‘दिनेश फूटवेअर’ नावाचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. दोन मुले आणि मुलीचे लग्न झाल्याने ते बाहेरगावी असतात. घरी सुरेश व पत्नी शकुंतला कांबळे हे दोघेच राहत. शकुंतला कांबळे यांचे गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता सुरेश कांबळे हे पत्नीला अंघोळीसाठी पाणी ठेवल्याचे सांगून बाहेर गेले. त्यानंतर शकुंतला या अंघोळ, स्वयंपाक करून हॉलमध्ये बराचवेळ बसल्या. मात्र, पती येत नसल्याने, मोबाईल कॉल घेत त्यांनी मुलांशी संपर्क केला. कांही वेळाने मुलाचा एक मित्र घरी आला व त्याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी मयत सुरेश कांबळे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात व्यवसायाची परिस्थिती बिकट झालेली असून खासगी सावकारांचे ६ टक्के व्याजाने पैसे घेतले आहेत. फिरवा फिरवी करून नैराश्य आले असून, त्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद आहे. तसेच संबंधित खासगी सावकारांवर कारवाई करावी, असेही लिहिले आहे.
चिठ्ठीतील मजकुरानुसार भारत हिलाल, विकी अभंगराव, शिवाजी गाजरे, बंडू भोसले, काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड, संजय व्यवहारे व इरफान अशा ७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित सावकार हे जातीवाचक शिवीगाळ करून, धमक्या देत त्रास देत होते, असे त्यामध्ये नमूद केले आहे.
