पंढरपूर :- पंढरपूर – कराड मार्गावरील डी वाय एस पी ऑफीस समोर असलेल्या रेल्वे पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा मार्ग चार ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत म्हणजे जवळपास 21 दिवस बंद राहणार आहे. रेल्वेने याबाबत अधिकृत पत्र पंढरपूर नगरपालिका, एसटी महामंडळ पंढरपूर, तहसीलदार पंढरपूर आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याला दिले आहे. त्यामुळे आता पंढरपुरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

पंढरपूर शहरातील बहुतांश शासकीय कार्यालय, शाळा या कराड रोडवर आहेत. मात्र याच कराड रोडवर असलेल्या रेल्वे पुलाचे काम पुढील 21 दिवस चालणार आहे. रेल्वे पुलाखालील रस्ता वारंवार दुरुस्त करून पुलाची उंची कमी झाली आहे. त्यामुळे कंटेनर, ट्रक सारखी मोठी वाहने वारंवार पुलाखाली अडकत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी चार ऑगस्ट पासून 25 ऑगस्टपर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम चालणार आहे. पुढील 21 दिवस उपनगरातील पंढरपूरकरांना, तसेच तहसील कार्यालय ,डीवायएसपी ऑफिस, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपनगरात जाण्यासाठी तसेच उपनगरातील नागरिकांना शहर पोलीस स्टेशन, नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालय , विठ्ठल मंदिर, भाजी मार्केट इतर खरेदीसाठी देखील शहरामध्ये यावे लागते. यासाठी सरगम चौक आणि टाकळी रोड रेल्वे ब्रिजचा वापर करावा लागणार आहे. एकंदरीतच शहरात येणारी वाहतूक बघता मोठी वाहतूक कोंडी या मार्गावर होण्याची शक्यता आहे.
हा होऊ शकतो पर्यायी मार्ग….
आषाढी यात्रा काळामध्ये सरगम चौकाच्या रेल्वे ट्रॅक वरून पालखी साठी रस्ता खुला केला जातो. त्याचप्रमाणे डीवायएसपी कार्यालया समोरून देखील रेल्वे ट्रॅक वरून किमान दुचाकी वाहतूक सुरू करावी. जेणेकरून सरगम चौक आणि टाकळी रेल्वे ब्रिज या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार या ठिकाणी गेट देखील बंद करावी लागणार आहे. या पर्यायी मार्गाचा विचार देखील करण्याची मागणी आता पंढरपूर मधून होत आहे.
