पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांच्या आघाडीची घोषणा झाली. मात्र अत्यंत गोंधळालेल्या स्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांनी आघाडीमध्ये जागावाटप कसे झाले ? अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली, प्रचाराला सुरुवात झाल्याने कोणत्या जागेवर कुठल्या आघाडीचा किंवा पक्षाचा उमेदवार कोणाला पाठिंबा देणार ? याबाबतची कुठलीही स्पष्टता जाहीर केली नाही. या सर्व विषयावर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार अभिजीत पाटील किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांना समर्पक उत्तर देता आले नाही.
जागा वाटपात अद्याप आमची चर्चा सुरू आहे. जागावाटप झाले की आपल्याला कळविण्यात येईल असे थातूरमातूर उत्तर देऊन पत्रकार परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न केला गेला. या पत्रकार परिषदेला आमदार अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, नगरसेवक नागेश काका भोसले आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊन प्रचार सुरू झाला आहे. पंढरपूर पंचायत समितीच्या 16 जागा आणि जिल्हा परिषदेच्या आठ गटांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा यशस्वी झाली नाही. अखेर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पाटील आणि भालके यांची आघाडीची घोषणा झाली.
वास्तविक प्रचार सुरू असताना आघाडी झाल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. उमेदवारांनी आपली प्रचार आणि त्यांना राबवण्यास सुरुवात केली आहे. आजचा पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद गटातील किंवा पंचायत समिती गणातील एकही उमेदवार हजर नव्हता. किंवा प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जागावाटप केले नाही. त्यामुळे फक्त नेते एकत्र आलेत का ? अशी चर्चा सुरू आहे.
यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी आम्ही दोघे एकत्र आल्याने पंचायत समितीवर आघाडीचा झेंडा फडकवू. हीच खरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली असणार आहे. समोरचा उमेदवारांचा सुफाडा साफ करू असा दावा यावेळेस अभिजीत पाटील यांनी केला.
तर दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी आम्हीच विठ्ठल परिवार आहोत. जी सोडून गेले त्यांनी विचारधारा बदलली आहे आम्ही आमच्या विचारधारेवर ठाम आहोत.
जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांमध्ये जागावाटप निश्चित होईल. जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा यावेळी भगीरथ भालके यांनी केला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख हे उपस्थित नसल्याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांच्या कुटुंबामध्ये कार्यक्रम असल्याने ते गैरहजर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मात्र दुसरीकडे वसंत नाना देशमुख यांच्याशी संपर्क केला असता आम्ही कासेगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा पक्ष म्हणून लढणार आहोत. भालके आणि आमदार पाटील यांच्या आघाडीला आमचा पाठिंबा नसल्याचा निर्वाळा यावेळी वसंतदादा देशमुख यांनी दिला.
