पंढरपूर :- सांगोला तालुका हा पारंपारिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख, स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पासून माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रयत्न केले. टेंभू, म्हैसाळ , निरा उजवा कालवा यासाठी पाण्याची मंजुरी देखील आली. मात्र यावर्षीचा संपूर्ण उन्हाळा संपला तरी सुद्धा या तीनही योजनेमधून पाण्याचा एक थेंबही सांगोला तालुक्याला मिळाला नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे. तर सांगोला शहर आणि तालुक्यातील 82 गावांसाठी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नऊ महिन्यांपासून थकीत वीज बिलापोटी बंद आहे.
सांगोला तालुक्यामध्ये कोणतेही मोठे उद्योग नाहीत. संपूर्ण तालुका शेतीवर आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. सांगोला तालुक्याला सिंचनासाठी टेंभू, म्हैसाळ आणि निरा उजवा कालव्यातून पाणी दिले जाते. 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी तीनही योजनांमधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले होते. मात्र निवडणुका संपल्या संपल्या हे पाणी बंद झाले. त्यानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी टेंभू, म्हैसाळ नीरा उजवा कालव्याचे पाणी येणार म्हणून अनेक आश्वासन दिली. त्यांनी दिलेल्या सर्व तारखा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुसरीकडे गेल्या 60 ते 65 वर्षात ज्या ज्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सांगोल्यात आमदार निवडून आले. त्यावेळी सांगोल्यावर कायम अन्याय झाल्याची भावना काही ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.
ऐन उन्हाळ्यात सिंचनासाठी योजनांमधून पाणी आलेच नाही. तर पिण्याच्या पाण्याची देखील हीच अवस्था झाली आहे. सांगोला शहर आणि तालुक्यातील 82 गावांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा करणारी शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ऑगस्ट 2024 पासून बंद आहे. अवघ्या पाच कोटी एकवीस लाख रुपयाच वीज बिल थकीत असल्याने ही योजना बंद आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत यावर विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कसलेल्या पुढार्याप्रमाणे उत्तर दिले. टेंभू म्हैसाळ योजनेतून पाणी आलं आहे. आणि शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होईल असा दावा त्यांनी केलाय.
दुसऱ्या बाजूला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी टेंभू, म्हैसाळ आणि नीरा उजवा कालव्याचे पाणी कालवा फुटल्यामुळे येऊ शकले नाही. असे म्हणत विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांची पाठराखण केली आहे. दुसऱ्या बाजूला आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठ्याचे बिल न भरल्याने शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद बंद पडल्याचा आरोप केलाय.
विधानसभा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी सांगोला तालुक्याला पाणी देण्यात आले. मात्र माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि सांगोल्यातून शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला.
आणि विरोधी बाकावर बसणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुख निवडून आले. त्यामुळेच ती काय सांगोलावासियांना पाण्यासाठी आजही वणवण करावी लागत आहे.

