पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची तब्बल सहा कोटी 35 लाख रूपयांची थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने तगादा लावला आहे. पाणी पट्टीची रक्कम भरा अन्यथा पाणी पुरवठा बंद केला जाईल अशी नोटीसही पालिकेला दिली आहे. दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही पदाधिकार्यांनी विनंती केल्यानंतर दोन ते तीन दिवसांची मुदत वाढ दिली आहे. पालिकेने थकबाकी वेळेत भरली नाही तर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांवर जल संकट ओढवण्याची भीती आहे. तर दुसऱ्या बाजूला विज बिल देखील थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची सुमारे सहा कोटी 35 लाख रूपयांची थक बाकी आहे. थकबाकी भरण्या संदर्भात जलसंपदा विभागाने नगरपालिकेला वेळोवेळी तोंडी व लेखी कळवले आहे.
त्यानंतर नगरपालिकेने काही रक्कम भरली आहे. थकीत रक्कम मोठी असल्याने जलसंपदा विभागाने थेट पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारो भाविक येतात. येणार्या भाविकांची व शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने वेळेत तोडगा काढावा अशी मागणी माजी पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसाट यांनी केली आहे.
…
जलसंपदा विभागाचे अधिकारी आज पाणी पुरवठा बंद करण्यासाठी आले होते. परंतु आम्ही त्यांना मार्च अखेर पर्यंत टप्प्या टप्प्याने थकबाकी भरण्याची विनंती केली आहे. ( महेश रोकडे, मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका)
