पंढरपूर :- सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या दिवशीच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज भरताना शेकापचे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील हे देखील उपस्थित असल्याने पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीचा मोठा गेम केल्याचे दिसत आहे.
विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून येणार हे नक्की आहे. तरी देखील पालकमंत्री जयकुमार गोरे ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा भाजपचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून यावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरताना शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासोबत अर्ज भरताना दिसून आले. तर करमाळ्याच्या शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील हे देखील जिल्हाधिकारी कक्षामध्ये उपस्थित होते.
मतदानाचा दिवस उजडे पर्यंत पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे किती मतदार
आपल्या गळाला लावतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
