पंढरपूर :- सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस कडून पंढरपूरचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यावर नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश अण्णासाहेब भोसले यांची सूचक म्हणून सही असल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये सारेच अलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे.
नगरपालिका निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले होते. अकरा नगरसेवकांच्या गटनेतेपदी नागेश काका भोसले यांची निवड करण्यात आली. यानंतर 12 एप्रिल रोजी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता ताई भालके यांनी काही नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
प्रवेश करणाऱ्यांच्या यादीमध्ये नागेश अण्णासाहेब भोसले यांचे देखील नाव होते मात्र ते प्रवेश करताना उपस्थित नव्हते. तीर्थक्षेत्र विकास आघाडी मध्ये असलेले राजकीय पक्षाचे नगरसेवक सोडून सर्व नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले होते.
मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या गटनेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला सूचक म्हणून सही केली आहे.
नुकताच शिवसेनेचा मेळावा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देखील पक्षातील अंतर्गत नाराजी दिसून आली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्यासाठी कुणी दावे नाही आणि कुणी उजवे सर्वजण सारखे आहेत असे सांगत त्यांनी या अंतर्गत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या गटनेत्यांनीच वेगळी भूमिका घेतल्याने विधान परिषद निवडणुकीत वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेस उमेदवारासाठी सूचक म्हणून सही हा भगीरथ भालके यांना धक्का मानला जात आहे. आता उर्वरित तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक विधान परिषद निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

गटनेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारा सुचक म्हणून सही केली असतानाच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ हे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्यासोबत अर्ज दाखल करताना दिसून आले. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक अक्षय गंगेकर हे शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांचा अर्ज भरताना उपस्थित होते. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीची नक्की भूमिका काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
